‘मोरया’च्या गजरात मंगलमूर्ती विराजमान बाप्पांचे जल्लोषी स्वागत
कोल्हापूर गणेश उत्सव २०१८
कोल्हापूर १३ :
‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष... ढोल-ताशा या पारंपरिक वाद्यांचा ताल, फटाक्यांची आतषबाजी, सुरेख आराशीची मांडणी, आरती, धूप-दीपाने आलेला भक्तीचा सूर, गणरायाची सुरेल गाणी, खीर-मोदकासह सुग्रास नैवेद्य अशा जल्लोषात गुरुवारी घरोघरी प्रथमपूज्य, बुद्धिदाता, विघ्नहर्त्या मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने अवघे कोल्हापूर आपल्या लाडक्या बाप्पाच्या भक्तीत रंगून गेले होते.
ज्याच्या आगमनाची भक्त गेले वर्षभर वाट पाहत होते, आठ दिवसांपासून ज्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती, नावीन्यपूर्ण आणि कलात्मक संकल्पनांना बहर आला होता, अशा या आबालवृद्धांच्या आवडत्या गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा दिवस गुरुवारी उगवला. गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधून देव आज घरोघरी येणार होता. त्यामुळे गुरुवारचा दिवस उजाडला तो भल्या पहाटे. घरादाराची झाडलोट झाली, अंगणात सप्तरंगांनी रांगोळी सजली, काही ठिकाणी फुलांचीच आरास आणि पायघड्या तयार झाल्या.
सार्वजनिक मंडळांची श्री ची प्रतिस्थापना आजच :
मंगळवार पेठ, शिवाजी पेठ परिसरातील तरुण मंडळांनी गंगावेश, पापाची तिकटी, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी मार्गावरून मिरवणूक काढली. बिंदू चौक, शिवाजी रोड, शिवाजी चौक, उमा टॉकीज, राजाराम रोड, स्टेशन रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, सुभाष रोड, आदी मार्गांवरून मंडळांची अधिक वर्दळ होती. गुरुवारी दिवसभरात जय शिवराय मित्र मंडळ, सुभाष रोड मित्र मंडळ, बालावधूत मित्र मंडळ, अमर तरुण मंडळ, राधाकृष्ण तरुण मंडळ ट्रस्ट, शिवाजी तरुण मंडळ, शिवशक्ती तरुण मंडळ (गोकुळ शिरगाव), कट्टा गु्रप, सुखकर्ता तरुण मंडळ, भैरवनाथ गल्ली मित्र मंडळ (पाचगाव), कात्यायनी मित्र मंडळ, शाहू पार्क तरुण मंडळ, जयहिंद तरुण मंडळ, शाहू दत्त मित्र मंडळ, फिनिक्स मित्र मंडळ, गोकुळ मित्र मंडळ, श्री तरुण मंडळ, शिवप्रेमी, इन्सॅट तरुण मंडळ, बागल चौक मित्र मंडळ, तिरंगा मित्र मंडळ, विश्वशांती तरुण मंडळ, प्रिन्स क्लब, महालक्ष्मी मित्र मंडळ, प्रॅक्टिस क्लब, त्रिमूर्ती मित्र मंडळ, एसटीसीएम तरुण मंडळ, क्रांती तरुण मंडळ, न्यू संभाजीनगर तरुण मंडळ, नृसिंह तरुण मंडळ, आदी मंडळांचा समावेश होता. ही आगमनाची मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
No comments:
Post a Comment